Saturday, July 28, 2018

कनिष्ठ स्थापत्य अभियंत्याची भूमिका आणि जबाबदाऱ्या कोणत्या आहेत?

कनिष्ठ स्थापत्य अभियंत्याची भूमिका आणि जबाबदाऱ्या कोणत्या आहेत?

मनोज खांडरे - Civil: कनिष्ठ अभियंता :

भूमिका आणि जबाबदाऱ्या

वास्तविक कोणत्याही पदाची भूमिका आणि जबाबदाऱ्या या प्रत्येक संस्थेनुसार वेगवेगळ्या असतात. तसेच त्यांचे स्वरुप विविध घटकांवर अवलंबून असतात. उदा. संस्थेच्या कामाचे स्वरूप आणि संरचना, वार्षिक उलाढाल आणि प्रकल्प इत्यादी. तरीही सर्वसामान्यपणे कार्यस्थळावर कनिष्ठ अभियंत्याची खालील मुख्य भूमिका आणि महत्वपूर्ण जबाबदाऱ्या असतात.

१. कार्यस्थळावर वरिष्ठ अभियंत्याला कार्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस मदत करणे.

२. दैनंदिन कामावर देखरेख ठेवणे, नियोजन आराखड्यानुसार ( Working Drawing )कामाची तपासणी करणे आजबाबदारी प्रत्येक बाबीचे गुणवत्ता परीक्षण यादीनुसार ( check list ) परीक्षण करणे.

३. ठेकेदारांनुसार दैनंदिन कामगार उपस्थिती अहवाल ( Daily Labor Status ) तयार करणे, वरिष्ठांच्या मदतीने कामाचे नियोजन करुन कामास आवश्यक गोष्टींची यादी तयार करणे. कामास आवश्यक साहित्याची यादी तयार करणे. साहित्य भांडारातील साठ्याची उपलब्धता पाहून उर्वरीत साहित्यासाठी वरिष्ठांची मंजुरी घेऊन सदरील साहित्य मागणी पत्रक ( material requisition slip ) मुख्यालयात पाठवून, त्याचा पाठपुरावा करणे.

४. सिमेंटचा वापर झालेल्या प्रत्येक कामावर ठराविक वेळा, आवश्यक कालावधीपर्यंत पाणी मारले जातेय याची नोंद ठेऊन देखरेख करणे.

५. कार्यस्थळावर आलेल्या बांधकामसाहित्याची मागणीपत्रकानुसार ( गुणधर्म आणि संख्या ) तपासणी व मोजणी करुन आवश्यक परिक्षण ( field tests ) करणे. साहित्य पुरवठादारांना पोहचपावती ( Delivery Challan ) देणे.

६. कामगारांकरवी कार्यस्थळी वेळोवेळी  स्वच्छता आणि टापटीपता राखणे. ( cleanliness & house keeping )

७. साहित्य देयक पावतीनुसार (material issue slip) ठेकेदारांना साहित्य देणे. ठेकेदारांच्या कामाचे निर्धारीत कालावधीनंतर मोजमाप घेणे, तसेच त्यांची बिले तयार करणे.

८. कार्यस्थळी बांधकाम सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे.

९. कामाचा दैनंदिन प्रगती अहवाल ( DPR ) लेखन करणे. पुढील कामांचे नियोजन करुन त्यानुसार आवश्यक कामगारांची, निर्णयांची आणि साहित्याची खातरजमा करणे. काही जरुरी असल्यास त्वरित वेळीच वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणे.

१०. वरिष्ठांच्या आदेशानुसार अन्य अनुषंगिक किंवा प्रासंगिक कामे करणे.

आनंद बावणे - Civil:

यांची दोन कामाची स्थळे आहेत . एक आहे शासकीय आणि निमशासकीय नोकरी . शासनाच्या सार्वजनिक बांधकाम व रस्ते ,  पाटबंधारे , वाटर रिसोर्सेस , जलनिस्सारण , टाऊन प्लॅनिंग , झेडपी , सेंट्रल मध्ये सिपीडब्ल्यूडी , रेल्वे व अन्य प्राधिकरणे इत्यादी अनेक खात्यात या पदावर अनेक ज्युनियर इंजिनिअर कार्यरत आहेत . हे बव्हंशी डिप्लोमा धारक असतात व संबंधित उपविभागीय कार्यालयामध्ये कार्यरत असतात .  सर्व्हे , बांधकाम , रोजगार हमी , इत्यादी फिल्ड वर्कवर देखरेख ठेवणे , ठेकेदाराकडून नकाशा व नमूद स्टॅंडर्ड नुसार काम करून घेणे , कामाची गुणवत्ता पाहणे-तपासणे व वरिष्ठांना अहवाल देणे , कामाची मोजमापे घेणे -लिहिणे-ठेकेदाराचे गुणवत्तेनुसार झालेल्या कामाचे  बिल बनविणे , अंदाजपत्रके बनविणे , नकाशे तयार करणे , निविदेसाठी कार्यालयास मदत करणे ,  हाताखालील कामगार इत्यादींची हजेरी-पगारपत्रक किंवा एनएमआर ( रोजंदारी हजेरीपट ) मेंटेन करणे ही सर्व कामे शासनात ज्युनिअर इंजिनिअर ला करावी लागतात . सेमिगव्हमेंट संस्था म्हणजे नगरपालिका , महानगरपालिका , एम.आय.डी.सी. , पाणीपुरवठा , इमेसीबी , इथेही हे पद आहे व तिथल्या कार्यप्रकारानुसार कामे करावी लागतात . शासन व निमशासन संस्थात कनिष्ठ अभियंता हा क्षेत्रीय कामाचा पायाभूत घटक होय !

हे फार त्रोटक लिहिले आहे . कामाची व्याप्ती समजावी एवढाच उद्देश आहे .
धन्यवाद !

( खाजगीमध्ये कामे व प्रकार त्या त्या कंपनीच्या / मालकाच्या गरजेनुसार असते .त्याचा उहापोह  मी केलेला नाही )

 Pradip Shete : मला माहित असलेल्या राज्य शासनातील जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता वर्ग 2 यांच्या कामाची कर्तव्ये खालील प्रमाणे आहेत. (जबाबदारी स्वतः घ्यावयाची असते. कर्तव्ये इच्छा असू वा नसो ती करावीच लागतात)

1) सर्वेक्षणः a.धरणे, कालवे यांचे सर्वेक्षण. (यात दोन भाग येतात प्राथमिक व सखोल)

b. Double levelling सर्वे. ( बेंच मार्क फिक्स करणे)
c) Plane table सर्वे
d) चेनींग करून धरण, कालवे यांची अंतरे स्थापित करणे.
e) Catchment area, लाभक्षेत्र इत्यादि निश्चित करण्यासाठी सर्वे.... इत्यादि.

2) धरण, कालवे, कालव्यावरील स्ट्रक्चर यांचे डिजाईन करणे. (स्वतंत्र विभाग असतो परंतु कामे हेच अभियंते करतात)

3) धरण , कालवे, स्ट्रक्चर यांचे अंदाजपत्रके तयार करणे.

4)प्रकल्प अहवाल तयार करणे.

5)प्रत्यक्ष कामावर  line out देणे.

6) अंदाजपत्रकानुसार कामावर देखरेख ठेवणे.

7) सिमेंट ,स्टील यांचा व इतर साहित्याचा हिशोब ठेऊन महिन्याला MSA (material sight account) देणे.

8) काम झाल्यानुसार मोजमाप वहीत मापे घेऊन देयके तयार करणे.

9)कामाचा दर्जा चांगला राहण्यासाठी गुणनियंत्रण करणे. (स्वतंत्र विभागा मार्फत)

10) रोजगार हमी ची कामे असल्यास हजेरीपत्रक तपासणी आठवड्याचे काम मोजून त्यावरील पुढील कार्यवाही.

11)काही जणांना भंडार विभागाचे काम करावे लागते.

वरील कामे सर्वसाधारण प्रकल्प विभागातील प्रमुख कामे आहेत. याशिवाय काही इतर कामे करावी लागतात. गाड्यांची देखरेख, पेट्रोल डिझेल घेणे , गाड्यांना देणे, लाँगबूक तयार करणे, वसाहत देखभाल, वसाहतीची इतर कामे. कामांची यादी खूप लांबवर जाईल.

याव्यतिरिक्त प्रकल्प पूर्ण झालेल्या ठिकाणी याच अभियंत्यांना शाखाप्रमुख (Section) म्हणून कामे करावी लागतात. त्यांची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणेः

1) धरण विभागासाठी स्वतंत्र शाखा/उपविभाग असतो. धरणामध्ये 15 आक्टोबर रोजी उपयुक्त 100% जलसाठा ठेवण्याची कसोटी या अभियंत्यावर असते.

2) पूरनियंत्रणासाठी योग्य ती खबरदारी घेणे.

3) देखभाल दुरूस्तीची कामे वेळच्या वेळी करणे.

4) कालव्यामधून आवर्तध वेळच्या वेळी व्हावे म्हणून योग्य गेट आँफरेशन करणे.

5) जलस्त्रोतात मत्स्यसंवर्धन होत असेल तर, बोटींग होत असल्यास त्याच्या निविदा बाबत कार्यवाही करणे.

6) शासनाला सादर करण्यासाठी वार्षिक नियोजन तयार करणे.

7) कालव्यावरील शाखांनी शेतकऱ्यांकडून कोणती पिके घेणार याबाबत अर्ज घेणे.

8) cropping patern प्रमाणे लाभक्षेत्रात पिके आहेत किंवा कसे याची पडताळणी.

9) आवर्तनानुसार कालवे, चारी द्वारे पिकास पाणी देणे

10) पाण्याचा हिशैब ठेवणे.

11) कालव्यावरील देखभाल दुरुस्तींच्या कामांची अंदाजपत्रके, निविदा, प्रत्यक्ष काम देखरेख इत्यादि कामे करणे.
अजूनही पुष्कळ कामे आहेत. जेवढी पटकन आठवली तेवढी पोस्ट करतोय.


टेरेसवर एक पिंपळाचं रोपटं आलं आहे...

टेरेसवर एक पिंपळाचं रोपटं आलं आहे. कापून टाकलं तरी काही दिवसांनी पुन्हा येतं. यासाठी काही सोपा उपाय आहे का..

Pushkar Pawar - Civil : टेरेसवर ज्या ठिकाणी पिंपळाचं रोपटं आलं आहे त्या ठिकाणी हाइड्रो क्लोरिक आम्ल झाडाच्या मुळा जवळ टाकले तर ते झाड़ मुळा सकट नष्ट होईल  कापून टाकलं तरी काही दिवसांनी पुन्हा पुन्हा येतं कारण त्याची मूळ जिवंत राहतात.

Dhananjay Reddy: एक लघू शंका. मूळ तर भीतीत राहतात, मुळावर औषध टाकण्यासाठी अगोदर भिंत पाडावी लागेल का ?

Pushkar Pawar - Civil: नाही, कारण भिंतीला अगोदर पासून च बारीक तडे गेलेले असतात आणि आम्ल हे द्रव्य रुपात असल्या मुळे ते पाणी ज्या प्रकार झीरपते त्याच प्रमाणे आम्ल ही झीरपते त्या मुळे भिंत पाडण्याची गरज नाही आहे.

सुचिकांत वनारसे: ही झाडे उगवूच नये म्हणून काही उपाय योजना आहेत का, म्हणजे ते बांधकाम करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल?

Omkar Girkar : झाडं उगवणं ही निसर्गाची ताकदवान क्षमता आहे. तिला १००% रोखणं अवघड आहे.
इमारतींवर झाडं उगवतात कारण..

१. तिथे थोडा सपाट कोपरा असेल तर धूळ बसून हळूहळू मातीसारखा थर तयार होतो.
२. पक्ष्यांची विष्ठा व वारा यामुळे सूक्ष्म बीज या थरावर येऊन बसतात. पाऊस किंवा बाष्प यामुळे त्यांचं फलन होतं व हळूहळू रोपटं तयार होतं. उभ्या भिंतींवर ही प्रक्रिया तुलनेने संथ असते किंवा होत नाही.
हे पक्ष्यांचं बसणं, धूळ बसणं, पाणी मिळणं बंद केलं तर रोपटी येणार नाहीत. शिवाय, हायड्रोक्लोरिक अॕसीटसारखे पर्याय आहेतच. पण ते नियमीत करावे लागतात. जसं आपण गाडीचं इंजीन अॉईल बदलतो.

Shivaji Dange - Civil:

झाडे बांधकामावर उगवू नये म्हणून खालील बाबी केल्या गेल्या पाहिजेत

- बाहेरील भिंतीना डब्ल कोट प्लास्टर
- जोता लेवल ला प्लिन थ प्रोटेक्शन
- इमारतीच्या आजू बाजूला तन नाशक फवारणे

अभ्यास धरण बांधणीचा

- मनोज खांडरे यांनी धरण बांधणीवरील अनेक पैलूंवर टाकलेला प्रकाश..

◼ धरणांची गरज

पाणी म्हणजे जल, आणि जल हेच जीवन आहे या वाक्यावरुन पाण्याचे या सृष्टीवर महत्व काय आहे ते जाणवते. कारण पृथ्वी वरील सर्व सजीवांचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे. मानवी शरीर अन्नाशिवाय काही आठवडे जिवंत राहू शकते पण पाण्याशिवाय सात दिवसांपेक्षा जास्त दिवस जगूच शकत नाही. मनुष्याला फक्त पिण्यासाठीच नाही तर आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी म्हणजेच अनेक नित्योपयोगी गोष्टींसाठी पाणी आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रातही पाण्याची प्रचंड आवश्यकता असते. ऊर्जानिर्मितीसाठी पाणी हेच माध्यम आहे. शेती करण्याकरता तर पाण्याची गरज सर्वात मोठी आहे..
दिवसें न दिवस वाढती लोकसंख्या,  मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण, जंगल तोड, जल प्रदूषण, कमी पाऊस, आटते जलस्त्रोत, उपलब्ध जलसाठ्यांचा गैरवापर यांच्यामुळे पाणीची टंचाई जाणवत आहे. देशातील अवर्षणग्रस्त भागांसाठी, तसेच वाढती लोकसंख्या आणि अनियमित व लहरी पर्जन्यमान यामुळे पावसाळ्याव्यतिरीक्त उर्वरीत काळात पाणी पुरवठा करण्यासाठी धरण बांधणीची गरज निर्माण झाली.
धरणांचे खालील मुख्य उपयोग आहेत.
१. शेती जलसिंचन : पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पुरक पाण्याला जलसिंचन असे म्हणतात.
२. दैनंदिन घरगुती पाणी वापरासाठी
३. औद्योगिक वापरासाठी
४. जलविद्युत निर्मितीसाठी

◼ धरणाच्या पायाचा अभ्यास

धरणबांधणीत मजबूत पायाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. साठवलेल्या पाण्याचा, स्वतःच्या वजनाचा, झिरपणाऱ्या पाण्याचा भार, ह्या सारख्या अनेक भार प्रणालींमुळे निर्माण झालेली प्रतिबले धरणाच्या पायावर सोपवली जातात. भूगर्भातून बाहेर पडणाऱ्या भूकंप लहरी सर्व प्रथम धरणाच्या पायाजवळ आघात करतात. ह्यासाठी धरणाच्या नियोजित जागेसभोवतालच्या प्रदेशात होऊन गेलेल्या भूकंपाची माहिती असावी लागते. त्या जागेत जोड आणि भूस्तरभंग आहेत का आणि असतील तर त्यांची आजची स्थिती, पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आणि त्याची क्षमता अजमावणे गरजेचे असते. शिवाय पायाचा खडक पारगम्य (permeable) नसेल तर पाणी झिरपून न जाता जास्तीत जास्त पाणी साठवता येते. त्यामुळे उत्तम अभेद्य खडक पायासाठी योग्य मानला जातो.  म्हणून धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भूगर्भातल्या खडकांचा प्रकार, पायाकरता योग्य खडकापर्यंत पोहोचण्यासाठी वरच्या थरांची खोली, खडकांची घनता, त्यातील पाण्याचे प्रमाण, वजन पेलण्याची क्षमता किंवा ताकद (strength) असे खडकांचे  अभियांत्रिकी गुणधर्म माहिती असणे अत्यंत गरजेचे असते. याकरता धरणाची जागा ठरवताना भूगर्भ  तत्ज्ञांची मदत घेतली जाते. भूगर्भ तत्ज्ञ पायाच्या खडकांबद्दलची  माहिती भूवैज्ञानिक आणि भूभौतिकी सर्वेक्षणाच्या साह्याने मिळवतात.

खडकांची सर्वांगीण माहिती कळण्यासाठी धरणाच्या जागेवर ठिकठिकाणी खोल छिद्रणे घेऊन जमिनीच्या विविध स्तरातील खडकांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत चाचणी करतात आणि ताकद, पारगम्यता सारखे खडकांचे अभियांत्रिकी गुण याबद्दल माहिती मिळवली जाते. ही  प्राथमिक पध्दतीने मिळवलेली माहिती सखोल भूभौतिकी पध्दती वापरून तपासली जाते. ‘इलेक्ट्रिकल साउंडिंग’, ही भूभौतिकी पध्दत वापरून resistivity (प्रतिरोध) मोजली जाते. अग्निजन्य खडकांची resistivity सगळ्यात जास्त ,गाळाच्या खडकांची सगळ्यात कमी तर रुपांतरीतची मध्यम असते. जितका खडक अभेद्य तितकी resistivity जास्त. खडकांमधल्या पाण्याच्या प्रमाणावर पण resistivity अवलंबून असते. खडकात जितके जास्त पाणी तितकी resistivity कमी. ह्या कारणासाठी पारगम्य खडकांची resistivity कमी असते.    भूकंपीय लहरींच्या अपवर्तनाचा (refraction) अभ्यास करून धरणाच्या नियोजित जागेतील वेगवेगळ्या थरातील खडकांची प्रत आणि खोलीबद्दलची संपूर्ण माहिती मिळवली जाते. ह्यालाच भूकंपीय अपवर्तन पध्दती(seismic refraction method) म्हणतात.

जेंव्हा लहरी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात तेंव्हा काही प्रमाणात परावर्तन(reflection) तसेच अपवर्तन (refraction) होते. या पध्दतीत खालील  आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रक्षेपक(Energy source) आणि ठराविक व सारख्या अंतरावर शोधक (detectors-Geophones) वापरले जातात. प्रक्षेपकाच्या जागी हातोडा किंवा उंचीवरून वजन सोडून भूकंपीय लहरी निर्माण केल्या जातात. ह्या लहरी विविध थरामधून प्रवास करतात. एका विशिष्ट कोनातल्या आपाती (incident) लहरी अपवर्तीत होऊन  दोन थरांच्या सीमेलगत प्रवास करतात आणि पुन्हा अपवर्तीत होऊन शोधकापर्यंत पोहोचतात. लहरी जवळच्या अंतरावरील शोधकापर्यंत सरळपणे पोहोचतात तर लांबच्या शोधकापर्यंत अपवर्तीत लहरी प्रथम पोहोचतात. लहरींचे प्रक्षेपण आणि प्रथम आगमनातील कालावधी नोंदविला जातो. प्रक्षेपक व शोधक यांमधील अंतर व ह्या कालावधीचा उपयोग करून प्रत्येक थरामधील लहरींच्या गतीचा अभ्यास केला जातो. घनता जास्त असेल तर लहरींचा वेग अधिक असतो त्यामुळे जितकी गती जास्त तितका खडक चांगल्या प्रतीचा. अशा पद्धतीने जमिनीखालच्या थरांची जाडी व प्रत कळते
अश्या सखोल अभ्यासानंतर पायाच्या खड्कांबद्दल महत्वाची माहिती घेऊन बाकी सर्व निकषांचा एकत्रितपणे अभ्यास करून धरणासाठी अनेक योग्य जागांचा विचार केला जातो. आणि नंतर सर्वात योग्य जागा निवडली जाते.

◼ धरण

ह्या पृथ्वीतलावर हवामान आणि पर्जन्यमानात इतकी विविधता आहे की एकीकडे घनदाट जंगले तर दुसरीकडे मोठी वाळवंटे तयार झालेली दिसतात.  आपल्या भारतातही बहुतांश भाग पावसावर अवलंबून आहे पण त्यात खूप अनिश्चितता आहे, कधी खूप जास्त पाऊस पडतो तर कधी अगदी कमी. तसेच ह्या पावसाचे प्रमाण एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत इतके बदलते की काही भागात उदा. उत्तर किंवा ईशान्य भागात गंगा, यमुना, ब्रम्हपुत्रा या हिमालयातल्या नद्यांना जवळजवळ प्रत्येक वर्षी पूर येतो तर काही भागात उदा वायव्य भागात पाऊस इतका कमी पडतो की शेती तर दूरच पण पिण्याच्या पाण्याची पण विवंचना असते.  २०१३ त उत्तराखंडमध्ये आणि अलीकडे जम्मू काश्मीरमध्ये पुराने घातलेले थैमान तर महाराष्ट्राच्या  मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा ह्या घटना अगदीच ताज्या आहेत.

म्हणजेच एकाच वेळेस ओला आणि कोरडा दुष्काळ देशाच्या वेगवेगळ्या भागात आढळतो. शिवाय नद्यांचे बरेचसे पाणी नियोजनाअभावी समुद्राला जाऊन मिळाल्याकारणाने जो मर्यादित मोसमी पाऊस पडतो तोही वाया जाऊ शकतो. वाढत्या लोकसंख्येच्या गंभीर प्रश्नामुळे उपलब्ध पाण्याचे दरडोई प्रमाणही  घटत चालले आहे. त्यामुळे कुठल्याही नागरी वस्तीच्या नियोजनात, बारमाही पाणीपुरवठा तसेच पूर किंवा दुष्काळ ह्या दोन्ही संकटापासून वाचवण्यासाठी पाण्याचे नियोजन हा सर्वात महत्वाचा भाग ठरतो. नागरी सुविधांबरोबर सिंचन, पूरनियंत्रण, वीजनिर्मिती, उद्योगासाठी लागणारे पाणी, जलक्रीडा, मत्स्योत्पादन किंवा इतर अनेक कारणांसाठी लहानमोठ्या जल उर्जा प्रकल्पांची योजना आखली जाते. अशा बहुउद्देशीय प्रकल्पामध्ये धरण हा महत्वाचा घटक असतो. नदीचा किंवा कुठलाही जलप्रवाह योग्य ठिकाणी अडवून खोऱ्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बांधलेली भिंत म्हणजे धरण होय. पाण्याचा साठा किंवा जलाशय निर्माण करणे आणि पाण्याची पातळी उंचावणे हे धरणाचे मुख्य कार्य. पावसाळ्यात पुरेसा साठा करून जेंव्हा पाण्याची मागणी ज्या प्रमाणात आवश्यक असेल त्या वेळेला त्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे हे धरणामुळे साधते. तसेच जलशक्तीचा वापर करून विद्युत निर्मिती करता येते.

◼ धरणांचा इतिहास

धरणांचा इतिहास पुरातन आहे. प्राचीन काळी म्हणजे इ.स.पूर्व काळातही इजिप्त,चीन येथे धरणे बांधली गेली होती. नाईल नदीवरील कोशेस येथे इ.स.पूर्व २९०० च्या सुमारास बांधले गेलेले १५ मी उंचीचे धरण हे सर्वात प्राचीन मानले जाते. इ.स.पूर्व २७०० मध्ये त्याच नदीवर बांधलेले ‘साद एल काफारा’ ह्या दगडी धरणाचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. भारतातही इ.स. ५०० -१८०० च्या काळात अनेक मातीची धरणे बांधली गेली. मातीच्या धरणाच्या उतरत्या भागावर तासलेले दगड बसवण्याच्या पध्दतीप्रमाणे इ.स. १०११ -१०३७ मध्ये तामिळनाडू मध्ये वीरनाम धरण बांधले गेले.

पहिले मोठे दगडी धरण पुण्याजवळ खडकवासला येथे १८७९ साली बांधले गेले. रोमन लोकांनीही पाणीपुरवठा आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी इटली, उ.आफ्रिका, स्पेन मध्ये दगडी धरणे बांधली. पहिले केबर नावाचे कमानी धरण इराणमध्ये १४ व्या शतकात बांधले गेले. रोमन साम्राज्य लयास गेल्यावर १६ व्या शतकापर्यंत फारशी प्रगती नसली तरी नंतर स्पानिश स्थापत्याविशारदानी मोठी धरणे बांधण्यात यश मिळवले. १९-२० व्या शतकात बांधकाम तंत्र, यंत्रसामग्री, कॉंक्रीटचा उपयोग, मृदअभियांत्रिकी ह्यात झालेल्या संशोधनामुळे धरण बांधणीचा उच्चांक गाठला गेला. १९६० मध्ये भारतात हरित क्रांती सुरु झाली आणि पाण्याची गरज वाढली. त्याच सुमारास उद्योग पण सुरु झाले आणि जलउर्जेची मागणी वाढली. २००६ मध्ये ४०५० धरणे पूर्ण आणि ४७५ धरणांचे बांधकाम चालू होते. १९५० ते १९९३ मध्ये भारत हा वर्ल्ड बँकेकडून सर्वात जास्त कर्ज काढणारा देश होता.

◼ धरण कुठे बांधतात

एखाद्या नदीवर धरण बांधावयाचे असल्यास ते कुठल्या ठिकाणी बांधावे आणि कुठल्या प्रकारचे म्हणजे कॉंक्रीटचे की मातीचे किंवा भारस्थायी की कमानी बांधावे, ह्या धरण बांधणीतील महत्वाच्या बाबी आहेत. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. म्हणजे धरणाच्या प्रकाराची निवड ही जागेच्या निवडीवर अवलंबून असते आणि ह्या उलट जागेची निवड करताना कुठल्या प्रकारचे धरण बांधणे शक्य आहे याचा विचार करावा लागतो.  जास्तीत जास्त फायदे देणारा पण पूर्ण सुरक्षित आणि तेही कमीत कमी खर्चात प्रकल्पाची आखणी करायची असेल तर धरणाची योग्य जागा निवडणे महत्वाचे असते.

धरणाची जागा ठरवताना अनेक तांत्रिक, सामाजिक आणि आर्थिक बाबींचा अभ्यास करावा लागतो. धरणासाठी योग्य जागा निवडण्यासाठी सर्वात पहिली पायरी म्हणजे सर्वेक्षण. प्राथमिक सर्वेक्षण हे टोपोशीटवर करतात. टोपोशीट म्हणजे जमिनीवरचे सर्व बारकावे दाखवणारे नकाशे. शिवाय उपग्रहाने घेतलेले फोटो, हवाई नकाशांचा पण अभ्यास केला जातो. धरणाच्या परिसरातल्या पर्जन्यमानाचा अभ्यास करण्यासाठी मागील अनेक वर्षाचे पावसाचे आकडे पाहून पुढील अनेक वर्षाचा अंदाज बांधला जातो. तसेच वेगवान वारा आणि भूकंप ह्यासारख्या अनेक परिणामाचे मोजमाप ही करावे लागते.

◼ जागा निवडीचे निकष

१. सामान्यतः जितकी धरणाची लांबी कमी तितका धरण बांधणीचा खर्च कमी या तत्त्वानुसार जिथे दोन डोंगरांमधली दरी अरुंद तिथे धरण बांधणे आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते.
२. धरणाच्या वरच्या बाजूस म्हणजे नदीच्या उगमाच्या बाजूस जितके रुंद खोरे तितके जलाशय मोठे म्हणजे पाण्याचा साठा मोठा.
३. खोरे जर घंटेच्या आकाराचे असेल आणि त्या निमुळत्या जागेत जर धरण बांधले तर दोन्ही उद्देश सफल होऊन ती जागा योग्य मानली जाते.
४. धरणाच्या जागेची जमिनीची पातळी नदीच्या खोऱ्याच्या पातळी पेक्षा जर उंच असेल तर धरणाची उंची कमीत कमी ठेवता येईल पर्यायाने उंचीचा फायदा मिळेल तोही कमी खर्चात.
५. धरण बांधणीनंतर पाण्याखाली येणाऱ्या जमिनीची किंमत कमीत कमी असावी.
६. धरणाची जागा निवडताना एकीकडे धरणामुळे निर्माण झालेल्या जलाशयात किती गावे बुडतील, किती लोकांना विस्थापित व्हावे लागेल, झाडे, पक्षी, प्राणी ह्यांच्या संदर्भात पर्यावरणाचे किती नुकसान होईल ह्या अनिष्ठ परिणामांचा आणि दुसरीकडे पूरनियंत्रण, कोरडवाहू जमिनीचे सिंचन, मत्स्योत्पादन, वीज निर्मिती सारख्या इष्ट परिणामांचा तौलनिक अभ्यास करणे गरजेचे असते.
७. बांधकामासाठी लागणारे साहित्य जवळ उपलब्ध असावे आणि त्याच्या वाहतुकीसाठी जागा सुगम असावी.
८. जागा शहर किंवा नगरांपासून सहजपणे पोचता येईल अशी असावी.
९. जलाशयाच्या भागातल्या खडकांमध्ये शिसे, जस्त सारखी पाणी दूषित करणारी खनिजे नसावीत.
१०. मजुरांच्या वस्तीसाठी धरणाजवळ जागा असावी .

धरणांची पाणी क्षमता

धरणातील पाणी आवक जावक मापे बघा, किती पाणी येते वा जाते माहिती आहे कां ???

1) टीएमसी ( TMC) म्हणजे काय ??
2) क्युसेक (Cusec )म्हणजे काय ??
3) क्युमेक (Cumec ) म्हणजे काय??

उत्तर

सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणे भरत आहेत, काही धरणांतून पाणीही सोडल्या जात आहे.
इतके टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. पण या संज्ञांचा नेमका अर्थ काय ??? आपणास फक्त "लिटर" ही संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवूया.

पाणी मोजण्याची एकके

स्थिर पाणी मोजण्याची एकके

१) लिटर
२) घनफूट
३) घनमीटर 
४) धरणातील पाणी मोजण्याचे एकक – टीएमसी  TMC (Thousand Million Cubic Feet) (अब्ज घनफूट)
एक टीएमसी म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट.
१ टीएमसी  = २८,३१६,८४६,५९२ लिटर्स

वाहते पाणी मोजण्याची एकके

१) १ क्यूसेक ( Cusec )– एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात २८.३ लिटर पाणी बाहेर पडते.
२) १ क्युमेक (Cumec) - एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात १००० लिटर पाणी बाहेर पडते.
उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९७ टीएमसी आहे.
म्हणजेच त्यामध्ये १.९७ x २८.३१७ अब्ज लिटर्स पाणी मावते.
याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडले जातआहे.
म्हणजेच ५०० x २८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.

महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी असलेली ०५ धरणे 👇

१)उजनी ११७.२७ टीएमसी
२)कोयना १०५.२७ टीएमसी
३)जायकवाडी ७६.६५ टीएमसी  ( पैठण )
४)पेंच तोतलाडोह ३५.९० टीएमसी
५) पूर्णा येलदरी २८.५६ टीएमसी

पर्जन्यमापन

आपल्या देशातील सर्व भागांत साधारणत: वर्षांतील पावसाळ्याच्या चार-साडेचार महिने पाऊस पडतो. जून ते ऑक्टोबर हा पावसाचा कालावधी असतो. उत्तर भारतात हिमालयाच्या डोंगररांगावर पाऊस हिमवर्षांवच्या स्वरूपातदेखील पडतो.

पाऊस हा पाण्याचा उगम असल्यामुळे पाण्याच्या मोजणीचा विचार करीत असताना पावसाची मोजणीविषयी समजून घेणेही आवश्यक आहे. पावसाच्या मोजणीचे एकक हे मेट्रिक सिस्टीममध्ये मिलिमीटर तर ब्रिटिश सिस्टीममध्ये इंच (एक इंच म्हणजे २५.४ मिलिमीटर) आहे.  बर्फाच्या स्वरूपातील पावसाची मोजणीदेखील याच एककात केली जाते.

पावसाची मोजणी ही पर्जन्यमापकाच्या  मदतीने केली जाते. पर्जन्यमापक हे साधारणत: रेकॉडिंग आणि नॉन-रेकॉडिंग अशा दोन प्रकारांत असतात.

रेकॉडिंग पर्जन्यमापक हे स्वयंचलित असून; त्यामध्ये घडय़ाळावर चालणारा ड्रम, त्यावर बसवलेले आलेखपत्र (ग्राफ) आणि त्यावर आलेखन करणारी पेन्सिल, इत्यादींचा समावेश असतो. पडलेला पाऊस आलेखपत्रावर आपोआप वाचता येतो. या पर्जन्यमापकावर ठरावीक कालावधीत पडलेला पाऊस, तसेच पावसाची तीव्रतासुद्धा (मिलिमीटर/तास) मोजता येते.  या पर्जन्यमापकाद्वारे पंधरवडय़ाचा एकूण पाऊसही मोजता येतो; म्हणूनच डोंगरदऱ्यांच्या दुर्गम भागात याचा वापर सोयीचा होतो. या उपकरणाच्या  वापरासाठी माणसाची गरज नसते.
नॉन-रेकॉडिंग पर्जन्यमापक हे फार सोपे आणि साधे उपकरण आहे. भारतामध्ये मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ या नावाने ओळखले जाते. हे पर्जन्यमापक जमीन पातळीवर पक्केबसवलेले असते. दररोज सकाळी आठ वाजता पर्जन्यमापकाच्या बाटलीत जमा झालेला पाऊस प्रमाणित मोजपात्राद्वारे मिलिमीटर वा इंचामध्ये मोजला जातो. या पर्जन्यमापकाद्वारे मागील २४ तासांतील पडलेल्या पावसाची उंची मोजता येते. पाऊस जमा करणारी बाटली साधारणत: १०० मिमी व्यासाची असते आणि ती १०० ते १२५ मिमी पाऊस जमा करते. मोठय़ा पावसाच्या कालावधीत दिवसातून तीन -चार वेळा मोजणी करावी लागते.
पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक ठेवताना, त्या ठिकाणापासून  किमान ३० मीटरच्या त्रिज्येमध्ये झाड, इमारत इ. अडथळे नसावेत. सपाट प्रदेशामध्ये साधारणत: १०० चौरस किलोमीटर क्षेत्राच्या परिसरात किमान एक पर्जन्यमापक असण्याची गरज आहे. हिमवर्षांव मोजण्यासाठी नॉन रेकॉडिंग स्नो गेजचा वापर केला जातो.

– डॉ. दि. मा. मोरे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, 
चुनाभट्टी,  मुंबई २२

बांधलेल्या घराची किंमत मार्केट रेटप्रमाणे कशी ठरवायची असते?

आपल्याच बांधलेल्या घराची किंमत मार्केट रेटप्रमाणे कशी ठरवायची असते? त्याची प्रोसेस काय ? -  वामन गोखले

विशाल गोहिल: 

आपल्या जवळच्या दुय्यम निबंधक कार्यालयातून रेडी रेकनर दर पत्रक घेऊन घर कोणत्या प्रकारात आहे किती क्षेत्रफळाचे आहे त्या प्रमाणे घराची किंमत मार्केट रेट प्रमाणे काढता येते.
किंव्हा दुय्यम निबंधक कार्यालयात जागेचा उतारा व घराचा पूर्णत्वाचा दाखल देऊन अर्ज केल्यास बाजार भावाने घराची किंमत मिळेल.

सुनील वरपे - Civil: रेडिरेकनर चे दर आणि प्रत्यक्ष दर यात फरक येतो ,चालू बाजारभाव तपासा.
विशाल गोहिल : जागेची खरेदी विक्री रेडी रेकनर दरानुसार होते.
________________

अक्षय थोरात - Civil: रेडी रेकनर दरात मुख्यत्वे  कोणत्या बाबींचा सामावेश असतो ??

R@vi Edake - Civil: रेडी रेकनर म्हणजे काय

प्रदीप शेटे : 

पूर्वी खरेदी विक्री करताना घरांच्या खऱ्या किंमतीपेक्षा खूप कमी किंमतीचे agreement  दुय्यम निबंधकाकडे व्हायचे. दोन्ही पार्टी agreement साठी (कमी किंमत दाखविल्यामुळे) सरकारकडे कमी कर भरावा लागायचा म्हणून या व्यवहाराला सहमत असायचे. यामुळे काळा पैसा निर्माण व्हायचा. यावर अंकूश बसावा म्हणून सरकारने ज्या ठिकाणचा खरेदी व्यवहार होणार त्या ठिकाणचे खरे बाजारभाव काय आहे त्याप्रमाणे  प्रत्येक ठिकाणची सूची(रेडीरेकनर) तयार करून ती प्रसिद्ध करायला सुरवात केली. यापेक्षा कमी भावाने खरेदीखत होऊ नये हा त्या मागचा उद्देश आहे. या रेडीरेकनरमुळे बऱ्याच प्रमाणात काळा पैसा निर्माण होण्यावर प्रतिबंध आला आहे.

मयुरेश मनोहर आंग्रे - Civil: 

पण आता परिस्थिती अशी आहे का रेडी रेकनर जास्त आहे आणी बाजारभाव कमी आहे  आणि अशा परीस्थितीमुळे रीअल ईस्टेट मंदीमध्ये आहे


विशाल गोहिल: अजूनही काही ठिकाणी घराच्या किमती खूप जास्त आहे. मंदी फक्त हातात cash नसल्याने आहे.

मनोज खांडरे - Civil: 

स्थावर मालमत्ता ( Immovable Property ) म्हणजे निवासी सदनिका, व्यापारी गाळे अथवा दुकाने, जमीनी, औद्योगिक गाळे आदींच्या खरेदी-विकी साठी महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे दर वर्षी वार्षिक बाजार मूल्यांकन तक्ता ( ASR : Annual Statement of Rates) म्हणजेच ( Ready Reckoner ) जाहीर केला जातो.

वार्षिक मूल्य दर तक्ते  तयार करणेची पध्दत सन १९८९ साली सुरु झाली.
नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक व मूल्यांकन कार्यालय पुणे, महाराष्ट्र शासन दर वर्षी स्थावर मालमत्ता मूल्य दर जाहीर करते. वार्षिक मूल्य दर तक्ता सामन्य इंग्रजी भाषेत (रेडी रेकनर) म्हणतात. सदर वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते आता पर्यन्त प्रत्येक वर्षीच्या १ जानेवारी पासून ते ३१ डिसेंबर त्या त्या वर्षा पर्यंत जाहीर करण्यात येत होते.
महाराष्ट्र मुद्रांक ( मिळकतीचे वास्तव बाजार मूल्य निश्चित करणे ) नियम १९९५ अंतर्गत तयार केलेले जाते, जमीन व इमारतीचे दर दर्शविणारे तक्ते म्हणजे वार्षिक मूल्य दर तक्ते. जमीन व इमारतीचे खरेदी - विक्री, करारनामा, खरेदीखत, विक्री करार, अदलाबदलपत्र, विक्री प्रमाणपत्र, वाटपपत्र, कुलमुखत्यारपत्र ( मोबदला घेऊन अथवा मोबदला न घेता तिऱ्हाईत इसमास मिळकतीची विक्री करण्यासाठी दिलेले कुलमुखत्यारपत्र ), संव्यवस्था, भाडेपट्टा, भाडेपटयाचे हस्तांतरण व विकसन करारपत्र या दस्त ऐवजाचे विषयवस्तू असलेल्या ( म्हणजेच दस्तात नमूद ) मिळकतीचे खरे बाजार मूल्यानुसार मुद्रांक शुल्क विचारात घेतले जाते. दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क भरविणे कामी वास्तव बाजारमूल्य निश्चिती करण्यासाठी त्याचा उपयोग करणे अवाक्ष आहे.

R@vi Edake - Civil: रेडी रेनकर आणि DSR वेगवेगळे ना....??

मनोज खांडरे - Civil: होय. DSR म्हणजे District Schedule of Rates सरकारी बांधकामांच्या मूल्यांकनासाठी जाहीर होतात.

आनंद बावणे - Civil: प्रॉपर्टीची खरेदी-विक्री रेडी रेकनरपेक्षा कमी किमतीने होतेय . मात्र खरेदी दाराला रेडिरेकनर प्रमाणे (अधिक) मुद्रांक शुल्क द्यावे लागतेय. यात अजून एक धोका आहे . जो कमी किमतीला विकतो , त्यांच्याकडूनही (रेडी रेकनर -- विक्री किंमत ) या रकमेवर दहा टक्के दंड द्यावा लागतोय . हे रत्नागिरी येथे समजले !

चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे काय?

चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे बांधकामाचे क्षेत्रफळ भागिले जागेचे क्षेत्रफळ.
चटई क्षेत्र निर्देशांक जेव्हा एक असतो तेव्हा जागेचे जेवढे क्षेत्रफळ असते तेवढेच बांधकाम करता येते. महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिंग कायद्यान्वये वेगवेगळया क्षेत्रांमध्ये वेगवेगळा चटई क्षेत्र निर्देशांक दिलेला आहे. शेती आणि ग्रामीण भागातील बांधकामासाठी कमी चटई क्षेत्र निर्देशांक दिलेला असतो. मुंबई शहरात चटई क्षेत्र निर्देशांक १.३३ आहे. मुंबईच्या उपनगरांमध्ये तो एक एवढाच आहे. औद्योगिक क्षेत्रात तो ०.५ ते ०.८ असतो. टीडीआरची कल्पना प्रथम मुंबईत सुरु झाली.साधारणपणे दर दहा वर्षांनी शहराचा विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन-डीपी) बदलत असतो.त्यात बगीचे, मैदाने, रुग्णालये, रस्ते रुंदीकरण,पोलिस स्टेशने, बाजार इत्यादीसाठी आरक्षण ठेवले जाते.या विकास आराखडयाप्रमाणे तो तो भाग विकसित करावा अशी अपेक्षा असते. ही आरक्षित जागा ताब्यात घ्यायची असेल तर मूळ मालकाला त्यापोटी योग्य तो मोबदला द्यावा लागतो. परंतू प्रत्यक्षात तेवढा निधी उपलब्ध नसल्याने ही विकास कामे करणे कठीण होते. यावर उपाय म्हणून टीडीआरचा जन्म झाला. मूळ मालकाकडून ताब्यात घेतलेल्या क्षेत्रफळाएवढा चटई क्षेत्र निर्देशांक दिला जातो.हा चटई क्षेत्र निर्देशांक त्याचा मालक खुल्या बाजारात शेअर प्रमाणे विकू शकतो.

- संकलित (विकिपिडीया)

Saturday, July 21, 2018

१२० वर्षे जुनी इमारत अजून भक्कम स्थितीत उभी आहे

१२० वर्षे जुनी इमारत अजून भक्कम स्थितीत उभी आहे



सुचिकांत वनारसे - मी ऐकलं आहे की ही बांधकामे चुना वापरून करतात. चुना जितका मळाल तितकं घट्ट बांधकाम होतं. पूर्वी ही खबरदारी घेतली जायची.

धनंजय रेड्डी - होय आमचे घर पण चुना व वाळू दळून बांधकाम केलेले आहे. जवळपास 80 वर्ष झाली असतील. भिंती पूर्ण दगडाच्या त्याही तीन ते साडे तीन फूट रुंदीच्या आणि वर विटे चा टोप आम्ही त्याला लादणी म्हणतो

ओमकार गिरकर - कॉन्क्रीट + विटा आणि दगडाचं विशेषतः बसाल्ट चं बांधकाम यात मुख्य फरक पडतो तो नैसर्गिक प्रक्रियेचा. दगड नैसर्गिकरित्या अतिशय सघन असतात. सर्वोत्तम दर्जाच्या सिमेंट कॉन्क्रीटची घनता साधारणतः २८०० किलो प्रति घनमीटर असते. तिथे बसाल्ट सहज ३४०० किलो/घनमीटर पार करतो. लोड बेअरींग पद्धतीच्या स्थापत्य रचना गुरूत्वीय बलाचा उत्कृष्ट वापर करतात. तसंच दगडावर हवा पाऊस यांचा परीणाम तुलनेत हळू होतो. फक्त बांधकामाचा वेग प्रचंड मंदावत असल्याने तसंच ही कामं करणारे कुशल कामगार दुर्मिळ झाल्याने आता दगडी बांधकामं करणं टाळलं जातं.

सुचिकांत वनारसे - ओमकार पण दगडी बांधकाम करायचं म्हटलं तर स्लॅब टाकता येणार नाही ना? की येईल? कारण भिंतींच वजन वाढेल. तेवढा सक्षम स्लॅब बनवणे शक्य होणार नाही ना?

अजय - पारंपारीक दगडी बांधकाम हे खुप खर्चिक आहे शिवाय त्यात जागेचाही खुप प्रमाणात अपव्यय होतो. आणी सध्या जागेचे दर ही गगनाला भिडले आहेत.

सुचिकांत वनारसे - हो ना ,नाहीतर ती घरे खुप सुंदर दिसतात

अजय - बरोबर आहे सर, आधुनिक स्थापत्य शास्त्रा नुसार देखील सुंदर असे घरे बांधता येतात.

सत्यजित काणेकर - गूळ चुना आणि शिस वापरून हे बांधकाम केले आहे

प्रदीप शेट्ये - आणि इमारतीही गगनाला भिडल्या आहेत. जिथे फ्रेम स्ट्रक्चर आवश्यक असून सिमेंटशिवाय इतर मटेरियल चा वापर सध्या तरी अवघड आहे.

ओमकार गिरकर -